Category: fort

किल्ल्यापलीकडील रायगड

Posted By : Sidhesh Save/ 1988 0

रायगड म्हणजे फक्त किल्ला नाही ! रायगड म्हणजे राजांचे एक असे स्वप्न आहे की ज्याची स्वप्नपूर्ती होऊन ते साक्षात अवतरले आहे. रायगड हे असंख्य शिवभक्तांचे प्रेरणास्थान आहे . रायगड एक भावना आहे , एक संकल्पना आहे. रायगड प्रचंड ऊर्जेचा असा स्त्रोत आहे की ज्याची ऊर्जा आपल्या नसानसांत वाहते आहे.
रायगडाच्या मातीचा प्रत्येक कण, तेथील दगड, तेथील पावसाचा प्रत्येक थेंब, तेथे घोंगवणारा वारा शिवाजी राजांचा जयजयकार करत असतो. तेथील चराचरात आपल्याला शिवरायांचे वास्तव्य जाणवते.
आजही रायगडावर महादरवाज्यापाशी पहारेकरी दक्षतेने उभे असतात. आजही ते दोन मनोरे दिव्यांनी प्रज्वलित होतात, आजही त्यातील पाण्याचे कारंजे चालू आहेत आणि त्याचे सुंदर असे प्रतिबिंब गंगासागर तलावात पडते आहे. पालखी दरवाज्यातून अनेक पाहुणे मंडळी नजराणे घेऊन येत असतात. आजही होळीच्या माळावर मोठे उत्सव साजरे केले जातात. आजही बाजारपेठेत अनेक व्यापाऱ्यांची रेलचेल चालू असते. आजही सिंहसनारुढ रयतेचा राजा राजदराबारात रयतेच्या समस्या सोडवतोय आणि स्वराज्याचा कारभार बघतोय आणि जिजाऊ आपल्या शिवबाकडे कौतुकाने पाहत आहेत. तेथे टकमक टोकांवरून तोफांचे आवाज गर्जत आहेत. जगदीश्वराच्या मंदिरात शंभू महाराज देवाला अभिषेक घालत आहेत. कोठेतरी ‘महाकवि भूषण’ महाराजांच्या स्तुती करणारी कविता , पोवाडे गात आहेत. संपूर्ण प्रजा सुखी आहे. आनंदी-आनंद आहे.. या साऱ्या फक्त इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी नसून, अशा एक ना अनेक घटना आजही रायगडावर घडत आहेत. परंतु त्या नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाहीत! हे सर्व तुम्हाला तुमच्या हृदयातून पाहावे लागते आणि त्या साठी इतिहासाची दृष्टी हवी! त्या साठी इतिहास फक्त शाळेच्या पुस्तकात मर्यादित न राहता तो जगता यायला हवा!
खरंच महाराष्ट्राला लाभलेला असा वैभवशाली इतिहास जगायला पाहिजे आणि तो जगवायला पाहीजे ….

 

-सिद्धेश सावे